रजिस्‍ट्रार

निबंधक ही युआयडीएआयने व्यक्तिंची नावनोंदणी करण्यासाठी अधिकृत केलेली किंवा मान्यता दिलेली संस्था असते. त्या युआयडीएआयशी सामंजस्य कराराने भागीदारी करतात व त्यांना देण्यात आलेल्या भूमिका व जबाबदाऱ्यांशी बांधील राहण्यासाठी जबाबदार असतात. त्या प्रामुख्याने विविध राज्य सरकारे, केंद्रीय मंत्रालये, बँका व सार्वजनिक क्षेत्रातील संघटना असतात ज्यांनी रहिवाशांच्या नावनोंदणीसाठी युआयडीएआयशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली असते.

कोण निबंधक होऊ शकते?

“निबंधक” प्राधिकरणाने युआयडी क्रमांकांसाठी व्यक्तिंची नावनोंदणी करण्यासाठी अधिकृत केलेली किंवा मान्य दिलेली संस्था असते. निबंधक सामान्यपणे राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व आपल्या कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या किंवा संचालनाची सामान्यपणे अंमलबजावणी करताना रहिवाशांच्या संपर्कात येणाऱ्या इतर संस्था व संघटना असतात. अशा निबंधकांची उदाहरणे आहेत ग्रामीण विकास विभाग (एनआरईजीएससाठी) किंवा नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग (टीपीडीएससाठी), जीवन विमा महामंडळासारख्या विमा कंपन्या व बँका.

निबंधक कसे व्हायचे?

युआयडीएआयने या टप्प्यात प्रामुख्याने राज्य सरकार, केंद्रीय मंत्रालये, व वित्तीय संस्थांना या कामात सहभागी करून घेतले. युआयडीआयने प्रत्येक निबंधकाशी सामंजस्य करार केला आहे ज्यामध्ये भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आली आहे व त्याचे पालन करणे आवश्यक आहे. सामंजस्य करारवर स्वाक्षरी केल्यानंतर निबंधकांना स्वतः किंवा नावनोंदणी संस्थांची निवड करून रहिवाशांची नावनोंदणी करायला सुरुवात करता येते.

राज्य व राज्येतर निबंधक

युआयडीएआयसाठी निबंधक म्हणून काम करणाऱ्या राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या संस्था राज्य निबंधक आहेत. सामंजस्य करार केलेल्या सर्व बँका व सार्वजनिक क्षेत्रातील संस्था राज्येतर निबंधक आहेत.

निबंधकांच्या भूमिका व जबाबदाऱ्या

  • युआयडीएआयशी भागीदारी करणे व नावनोंदणी प्रक्रिया राबवताना युआयडीएआयने निश्चित केलेल्या यंत्रणेचा वापर करणे
  • नावनोंदणीसाठी युआयडीएआयने दिलेल्या सॉफ्टवेअरचाच उपयोग करणे, ज्यामध्ये प्रत्येक नावनोंदणीमध्ये/सुधारणेसमोर नावनोंदणी पॅकेटचा भाग म्हणून लेखा डेटा नोंदविण्याची तरतूद असेल, ज्यामुळे नावनोंदणी केलेला ग्राहक, परिचालक, पर्यवेक्षक, नावनोंदणी संस्था, निबंधक, व कोणतीही इतर माहिती सहज शोधता येईल.
  • संगणक, प्रिंटर, जैवसांख्यिक उपकरणे व इतर साहित्य यासारखी साधने प्राधिकरणाने वेळोवेळी विहित केलेल्या सूचनांप्रमाणेच असतील.
  • नावनोंदणीसाठी वापरली जाणारी जैवसांख्यिक साधने युआयडीएआयने विहित केलेल्या नियमांची पूर्तता करणारी असतील तसेच प्राधिकरणाने शिफारस केलेल्या प्रक्रियेनुसार प्रमाणित केलेली असतील
  • रहिवाशांच्या नावनोंदणीसाठी नावनोंदणी संस्थांची नियुक्ती करणे, संस्थांसाठी प्रशिक्षण व नियमित निरीक्षण आयोजित करणे.
  • युआयडीएआयने तंत्रज्ञान, साधने व प्रशिक्षण, जागरुकता वाढवणे, नावनोंदणी, प्रमाणीकरण इत्यादी प्रक्रियांच्या संदर्भात निश्चित केलेल्या मानकांची खात्री करणे.
  • निबंधक स्वतः किंवा त्यांनी कंत्राट दिलेल्या नावनोंदणी संस्थांद्वारे रहिवाशांची नावनोंदणी करतील. निबंधकांकडे सूचीबद्ध नावनोंदणी संस्थांशी किंवा त्यांना योग्य वाटणाऱ्या इतर कोणत्याही संस्थांशी अशा संस्थांशी कंत्राट करण्याच्या त्यांच्या स्वतःच्या यंत्रणेचे पालन करून करार करण्याचा पर्याय असेल.
  • केवळ सुरक्षित एफटीपी माध्यमाचाच वापर करून नावनोंदणी पॅकेट सीआयडीआरकडे पाठविणअयात आल्याची खात्री करणे.
  • त्याचवेळी संकलित करण्यात आलेल्या डेटाचे योग्य ते संरक्षण केले जाईल याची खात्री करणे; सहाय्यक दस्तऐवजांच्या सुरक्षित प्रती राखून ठेवणे व ज्याप्रकारे व ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी युआयडीएआयला उपलब्ध करून देणे
  • उपेक्षित रहिवाशांची जास्तीत जास्त नावनोंदणी होईल याची खात्री करण्यासाठी नागरी संस्था संघटनांशी व तळागाळात काम करणाऱ्या इतर गटांशी भागीदारी करणे
  • तक्रार निवारण, ईए कामगिरीचे निरीक्षण इत्यादींसाठी युआयडीएआयने निश्चित केल्याप्रमाणे प्रक्रिया स्थापित करणे; युआयडीएआयला वादाच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी मदत करणे

निबंधकांची नियुक्ती करण्यासाठी दस्तऐवज

युआयडीएआयने निबंधकांची नियुक्ती करण्यासाठी सुनियोजित प्रक्रिया निश्चित केलेली आहे व निबंधकांना नावनोंदणीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी दस्तऐवजांचा एक संच आहे. निबंधकांसाठी महत्वाचे सर्व दस्तऐवज नेहमी सुधारित केले जातील व संदर्भासाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतील. नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त निबंधकांची यादी व संबंधित सामंजस्य करारही संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

निबंधकांनी विशिष्ट क्षेत्रातील रहिवाशांची नावनोंदणी पूर्ण करण्यासाठीची योजना निश्चित केली पाहिजे ज्यासाठी आरएफक्यू/आरएफपी नमुन्याद्वारे ईए निवडला पाहिजे. युआयडीएआयकडे सूचीबद्ध संस्थांची यादी आहे ज्यांची तांत्रिक व आर्थिक माहिती तांत्रिक समितीने पडताळली आहे व ज्या नावनोंदणी करण्यासाठी तयार आहेत.

युआयडीएआयने ईएच्या निवडीसाठी नमुना आरएफक्यू संदर्भ दस्तऐवज म्हणून विकसित केले आहे व ते संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निबंधकांच्या आवश्यकतेनुसार व निबंधकांना ज्या भागात नावनोंदणी सुरु करायची आहे त्याच्या भौगोलिक ठिकाणानुसार दस्तऐवजात बदल करणे आवश्यक आहे.

निबंधकांनी पुढील निकषांच्या आधारे ईए निवडणे आवश्यक आहे

  • तांत्रिक व आर्थिक क्षमता
  • नावनोंदणीचे प्रमाण
  • त्या भागातील नावनोंदणीच्या कामाचे वेळापत्रक
  • डेटा संग्रहण आवश्यकता व
  • नावनोंदणी पायाभूत सुविधेची तरतूद

समावेशामध्ये निबंधकांची भूमिका

निबंधकांना महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, भटक्या विमुक्त जमाती किंवा कायमस्वरुपी निवासस्थान नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तिंसाठी व अशा प्रकारच्या इतर वर्गवारीतील व्यक्तिंच्या नावनोंदणीसाठी विशेष उपाययोजना कराव्या लागतील.

निबंधकांनी ज्यांच्याकडे युआयडीएआयद्वारे विहित एक किंवा अधिक सहाय्यक दस्तऐवज आहेत व तसेच ज्या इतर नागरिकांकडे त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी कोणतेही दस्तऐवज नाहीत अशा सर्व उपेक्षित वर्गवाऱ्यांमधील/दुर्बल गटांमधील व्यक्तिंचा समावेश करण्यासाठी तरतूद केली पाहिजे.

निबंधक ज्या संस्थांमध्ये केवळ महिलांची नावनोंदणी होणार आहे अशा संस्थांमध्ये महिला संचालकांची तरतूद करतील. निबंधक प्रसूतीगृहासारख्या ठिकाणाही नवजात बालकाच्या नावनोंदणीची तरतूदही करतील.

निबंधकांची कामे

  • नावनोंदणी संस्थांची नियुक्ती करणे
  • प्रशिक्षण आयोजित करणे व नावनोंदणीचे निरीक्षण करणे
  • नावनोंदणीची पॅकेट प्रक्रियेसाठी सीआयडीआरकडे पाठवणे
  • नावनोंदणी दस्तऐवज डीएमएसच्या (दस्तऐवज व्यवस्थापन यंत्रणा) अर्जात हस्तांतरित करणे
  • नावनोंदणीदरम्यान संकलित केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी
  • बैठकींना हजर राहणे व प्रक्रियेविषयी ताजी माहिती घेणे